Popular Posts

Saturday, January 7, 2012

मनमोकळे बोलशील का ..?


मनमोकळे बोलशील का ..?



अगदी सहजपणे , ना ठरवून कधी
एकटी मला तू भेटशील का ?
नको करू तू प्रेमाच्या गोष्टी
पण मनमोकळे मजसी बोलशील का ?



नटून-सजून ना येता कधी
साधी खऱ्या रुपात भेटशील का ?
नाटकी हासून ना बोलता कधी
हक्काने आपला मानून रडशील का ?



अंतरी दाबलेल्या दु:ख्खास कधी
धबधब्याप्रमाणे मजसमोर तू वाहवशील का ?
नाही मानलेस साथीदार कधी
तरी सुख-दु:ख्खात भागीदार तुझ्या करशील का ?



नको करू तू प्रेमाच्या गोष्टी
पण मनमोकळे मजसी बोलशील का ...?


---- संजय कुलकर्णी.

प्रेम दिवाणा ..!!


प्रेम दिवाणा ..!!



मन मोडण्याची
तुझी हि पहिली वेळ नाही ,
प्रेम करण्याची
माझी पण काही सीमा नाही ..!!



तुला पाहून
मी का पुन्हा वळतो आहे ,
मला बघून
तू खरंच हसलीस तर नाही ..!!



मला बघून
इशारे नजरेने तुझे सहजी झाले ,
तुला पाहून
प्रेम माझ्या मनातून उत्स्फूर्त आले ..!!



मला भेटून
तुला काही हृदयी जाहले होते ,
अबोल हासून
तू प्रेमसंकेत जरूर दिले होते ..!!



मला खेळविण्याचे
तरी तू कधी टाळले नाही ,
मन वळविण्याचे
तुझे मीही कधी सोडले नाही ..!!



अशा अबोल्याने
फरक तुला काही पडला नाही ,
खरं सांगतो
तेव्हापासून स्वप्नातून तू गेली नाही ..!!


--- संजय कुलकर्णी .

आठवणी ...


आठवणी ...




भरलेल्या जखमेवरील काढून खपली
आठवणी डोळ्यातून झरझरा वाहतात ,
अन कधी आसवून तनमनी
सखयाच्या मीलनाची ओढ लावतात ..!



ध्यानीमनी नसताना अचानक उगवतात
फणा काढून डंख उदासीनतेचा मारतात ,
कधी बेभान बरसलेल्या भिजलेल्या स्मरणांनी
जागवून रात्रभर स्वप्नी पहाटेस छळतात ..!



दूर राहून आठवणींनी जवळी राहण्याचा
हा त्याचा अनोखा प्रेमाचा फंडा ,
मनातून मात्र आठवांनी सजणासवे राहण्याचा
जगावेगळा माझा मनस्वी प्रेमाचा धंदा ...!!!



--- संजय कुलकर्णी .

मी आनंदयात्री ...!!


मी आनंदयात्री ...!!



क्षण क्षण अपुरा पडत जातो
आनंद अफाट वाही ,
अता दु:ख्ख्ही कल्पना वाटते
हताश वाटत नाही ..!


भुरभूर लावत ओसंडती भावना
घेत ताबा मनाचा ,
उल्हासित अविरत जीवाला
सावरता येत नाही ..!


अकस्मात भेटते सुख
आनंदासी निरपेक्षुनी लुटता ,
प्रेमानंदी विहरता इतरांस पाहुनि
जीव आत्मानंदी नाची ..!!


एकलकोंडी निराश रडगाणी
हरवते मुक्तपण ,
भ्रामक काल्पनिक विराणी
मनास रुचतच नाही ...!!!


-- संजय कुलकर्णी .

खरंच .. मी कुठं कविता लिहितो !!


खरंच .. मी कुठं कविता लिहितो !!



सहजा सहजी सर्वांस कळणारा अर्थ
अगम्य अगाध शब्दात कुठं मांडतो ?

हळव्या मोरपिसी मन मोहक भावनांचा
अलंकारिक कृत्रिमपणे कुठं चिरफाड करतो ?


खरंच .. मी कुठं कविता लिहितो ..!!



सच्चे प्रसंग तुमच्या माझ्या जीवनातले
तुमच्याच शब्दात फक्त लिहित सुटतो ,

अंतरातील सुप्त आकांक्षा स्वप्नांस बिनधास्तपणे
तुमच्याच समोर मनमोकळे सांगत रहातो !


खरंच .. मी कुठं कविता लिहितो ..!!



व्याकरणास मी मुळीच ना जाणतो
भावना मात्र सच्च्या मी कथतो ,

ओढून ताणून गेयात्मक ना रचतो
सर्वांची मनस्वी उत्स्फूर्त दाद मिळवितो !


खरंच .. मी कुठं कविता लिहितो ..!!


-- संजय कुलकर्णी .

प्रेमात तुझ्या मुळीच नाही ...!!


प्रेमात तुझ्या मुळीच नाही ...!!



समजू नकोस तू वागणे तुझे समजत नाही
ऐकावे मनाचे कसे हेच तुला उमजत नाही !



लक्ष वेधण्याचे तू नित्य-नवे प्रयत्न करत राही
कटाक्ष टाकता मी हर-तर्हे मज टाळत राही !



बोलण्यास मजला तू सतत भाग पाडत राही
विचारता काही मी गप्प राहुनी रुसत राही !



भोगले जयांस तू स्मरूनी उदास जगत राही
फुलविता आशांस मी दाबुनी भावनांस झुरत राही !



कळले ना तुला नकळत स्वप्ने प्रीतीची पाही
म्हणतेस कशी मला प्रेमात तुझ्या मुळीच नाही ..?


-- संजय कुलकर्णी .

बोल अंतरात्म्याचे ..!



मनी दाटलेल्या प्रश्नांची कशास शोधिसी तू उत्तरे
समजुनी तयासी काय फरक पडेल तुझ्यात खरे ..?



खुळ्या ... शहाण्यासारखी गप गुमान कर तू चाकरी
नशिबी तुझ्या बोलणी साहेबाची अन बायकोची गुलामगिरी ..!



मारू नकोस मस्का दररोज जावूनी तू मंदिरी
देवांनाही पुसतां ना येत प्रारब्धाच्या हातावरील लकेरी ..!



मानलीस कितीहि तू सारी आदर्श जीवनाची तत्वे
भूक लागता दुपारी गीळशील आपसूक कुठलेही तुकडे ..!



सुचणार नाही कधी तुला सुखस्वप्नांची भावमधुर प्रेम-वचने
रडत-कुढत तू गा सदैव नैराश्यी गंभीर शब्द-कवने ..!!



-- संजय कुलकर्णी .

उद्दिष्ट जीवनाचे लाभले ...!!


उद्दिष्ट जीवनाचे लाभले ...!!



विचार न करता आयुष्याचा
प्रत्येक क्षण आनंदात जगलो !


उद्दिष्ट काहीही न ठरविता
सापडेल त्या मार्गावरून चाललो !


कोणास भेटावयाचे न ठरविता
साथ येईल तयाबरोबर रमलो !


ठरवून कधी का जगता येते ?
जसे आले तसे खुशीने भोगले !


मागुन हटून हवे ते
कुणास कधी का मिळते ?


आस न धरता कधी सुखाची
मिळाले त्यात आनंदास भरपूर लुटले !


आनंदी पाहून मजला, लोक हसले
वेड लागले ह्याला, चिडवून बोलले !


शहाणपणाने खरया आनंदास गमाविले
वेडात सहजी सुखांस मिळविले ..!!


खरंच सांगतो मी तुम्हाला
वेडात खरे उद्दिष्ट जीवनाचे लाभले ..!!


--- संजय कुलकर्णी .

अबोल प्रीत ...!!


अबोल प्रीत ...!!



का मज शोधते , रागावते पण प्रेम नाकारते
लांबुनी मज पाहते , हसते पण बोलण्यास घाबरते !



आवडते तुझी अदा , तुही फिदा पण जनरीत सलते
भेटण्यास आल्यावरी का , कशी तू लाजून पळते !



ओंजळीत घेऊन न्याहाळतो , ओठ ओठांसी अलगद जुळते
दचकून जाग येता , स्वप्न भंगून हुरहूर लागते !



चंद्र चांदण्यास पौर्णिमेच्या , पाहण्यास मन माझे टाळते
तुझ्या सारखेच क्वचित , दिसून हळूहळू गायब होते !




साथ माझी टाळतेस , तरीही सखा जिवलग मानतेस
नाते जरी ठोकरतेस , तरीही मनी मजला स्मरतेस ...!!!



--- संजय कुलकर्णी .

शब्द माझा तुला भाव तुझा मला गीत जुने तरी अर्थ जाणला पुन्हा


शब्द माझा तुला भाव तुझा मला
गीत जुने तरी अर्थ जाणला पुन्हा = धृ =.


बोल माझ्यासवे
गुज मनातले
नाच मयुरासवे
आनंदे हासुनी
गाली तुझ्या जसा खुलुनी गुलाब लाजला !


शब्द माझा तुला भाव तुझा मला
गीत जुने तरी अर्थ जाणला पुन्हा = १ =



थंडी मदभरी
तशात बोचरी हवा
रजई जुनीतरी
स्पर्ष उबदार नवा
धुंद वातावरणी जीव पुन्हा संजीवन जाहला !


शब्द माझा तुला भाव तुझा मला
गीत जुने तरी अर्थ जाणला पुन्हा = २ =



गाठ अपुली
कारणाशिवाय ना पडली
अधुर्या प्रेमकहाणीची
पूर्तता रुणानुबंधे घडली

संग माझा तुझा असा जन्म जन्मातला !


शब्द माझा तुला भाव तुझा मला
गीत जुने तरी अर्थ जाणला पुन्हा = ३ =



---- संजय कुलकर्णी.

नजरेत तूझ्या ...


नजरेत तूझ्या ...



नजरेत तूझ्या भावनांचे गहिरे रंग भरलेले ,
त्यातल्या काही रंगाने मजला वेड लावलेले ..!!



नजरेत तूझ्या मनाचे गूढ अंतरंग दडलेले ,
त्यामुळे मला स्फुरले प्रेमतरंग माझे लपलेले ..!!



नजरेत तूझ्या जीवनाचे मनोहर रूप सजलेले ,
त्यातील गुलाबी रंगात माझे स्वप्न पाहिलेले ..!!



नजरेत तूझ्या आनंदाची झाक हळुवार फुललेली ,
त्यामध्ये लाभली सुखाची किनार मला हरवलेली ..!!



नजरेत तूझ्या दु:ख्खाची काळी छटा पसरलेली ,
त्यामध्ये माझ्या ध्येयाची दिशा मला उमजलेली ..!!



नजरेत तुझ्या काळजी भविष्याची अबोल बोलणारी ,
त्यामुळे लागली ओढ जीवनांत तुला बहरविण्याची ..!!



नजरेत तुझ्या प्रेमाची आस नकळत पाणावली
त्यातूनच माझी प्रीत मनस्वी तुजवर बरसली ..!!!


---संजय कुलकर्णी .

राहीन तुझ्या मना ..!!


राहीन तुझ्या मना ..!!



तेव्हा सर्व जगाला वाटेल माझ्या प्रेमाचा हेवा ,
दूर असुनी सुद्धा जेव्हा घेशील माझ्या नावा ..!!



हळुवार शीत पवनाने भासावा तुला स्पर्षं माझा ,
येथून उबदार हवेतून भरावा सुगंधित श्वास तुझा ..!



प्रफुल्लीत उत्साही आनंदी अशा सुप्रभाती ,
समोर तुझा हसरा मुखडा मलाच फक्त दिसावा ..!



गीतातून ऐकता कुणाची प्रेमातुर आर्त साद
तुझ्या लाडिक स्वरांनी सारा आसमंत गुंजून जावा ..!



रात्र रात्र जगून पहाटेस डोळा माझा लागावा ,
त्याचवेळी स्वप्नात तुझ्या बाहूत मी असावा ..!!



तेव्हा सर्व जगाला वाटेल माझ्या प्रेमाचा हेवा
दूर असुनी सुद्धा घेशील जेव्हा माझ्या नावा ..!!


---संजय कुलकर्णी .

बंदिवान ...!!


बंदिवान ...!!



अजून किती कवाडं बंद करून ठेवायची
अजून किती मने कोशात अडकवून रहायची !


अशाच का पिढ्यान पिढ्या माणसांच्या इथे जन्मल्या
असाच का आशांशिवाय प्रवाह जीवनाचा सतत वाहला !



अरे कसे अजून नयन अंतरीचे ना उघडले
झाकले कितीतरी फटीतून किरण प्रकाशाचे पांगले !



पाठ करून प्रकाशासी गोडवे अंधाराचे किती गायचे
अजून बंदिवान अहंकाराचे मुक्तपणे जीवनात ना नाचले ...!!



---संजय कुलकर्णी .

मनस्वी प्रेमळ अतूट निरंतर , मोहक सोज्वळ अनोखे मैतर .. !!


मनस्वी प्रेमळ अतूट निरंतर ,
मोहक सोज्वळ अनोखे मैतर .. !!



मनस्वी प्रेमळ अतूट निरंतर
मोहक सोज्वळ अपुले मैतर ..
जन्मो जन्मी पुन्हा जन्मती
जपण्यासाठी ... मैत्र जन्मजन्मांतर ... !!

मनस्वी प्रेमळ अतूट निरंतर ...!!



असेच सहजी तुला आठवावे
अन त्याचवेळी तुही दचकावे,
मम भासांनी बावरे व्हावे
मनी आसुनी शोधावे दिनभर

मनस्वी प्रेमळ अतूट निरंतर ...!!



मला भेटुनी रडते हसते
भडभडा बोलुनी भांडते भयंकर ,
निरोप घेता म्हणते नंतर
चिडलास का मजवर खरोखर ..?

मनस्वी प्रेमळ अतूट निरंतर ...!!



कधी रागावूनी मी तोडावे
कधी फणकारुनी तुही रुसावे,
अहंकारे नडलो तरी ही
एकमेकांस ना विसरावे क्षणभर ...!!

मनस्वी प्रेमळ अतूट निरंतर ...!!



तुझ्यापासुनी मी मैलो कोसांवर
माझ्याजवळी तू एका हाकेवर,
उदास होता कधी पळभर
फडफडूनी पापणी तुही सैरभैर ...!!


जन्मो जन्मी पुन्हा जन्मती
जपण्यासाठी... मैत्र जन्मजन्मांतर ..

मनस्वी प्रेमळ अतूट निरंतर ...!!!


--- संजय कुलकर्णी.

नातं अपुलं ... खरंच.. असं असावं !!






नातं अपुलं
अदभूत अनोखं असावं !
जाणु जाता
कुणा ना कळावं ..!!



कुठल्याही बंधनाच
ठावं ठिकाण नसावं ,
दोघांच्या खुशीच
आनंदी सहजीवन असावं ..!!



वाद तंट्याच
चवी पुरतं असावं !
रुसण्या मनवण्यात
उधाण प्रेमास यावं ..!!


दोन काया
परी एकरूप वाटावं !
दोन मुखातून
एकमेकांच्या मनीचं बोलावं ..!!



दो अंतरातून
एक स्वप्न वसावं !
तनमन अर्पून
आनंदवन जीवन करावं ..!!


---संजय कुलकर्णी .

मन मंदिरी मी तुजसवे नांदतो ...!!





मन मंदिरी मी तुजसवे नांदतो
तुला न भेटता मनी तुझ्या प्रेमास जाणतो ....!! धृ !!



असेच रोज सकाळी तू
दर्पणी बघ साजणे
असेच मला देखुनी तू
गाली हास लाजरे
गालावरील खळीस तुझ्या मी इथे हळूच चुंबतो !


मन मंदिरी मी तुजसवे नांदतो
तुला न भेटता मनी तुझ्या प्रेमास जाणतो -- १ --



अशीच रोज नटुनी
वाटेवर लाव तू डोळे
अशीच ना दिसल्यावरी
उदास होशी तू खुळे
डोळ्यातील आसवे तुझी मी इथुनी टिपतो !


मन मंदिरी मी तुजसवे नांदतो
तुला न भेटता मनी तुझ्या प्रेमास जाणतो -- २ --



अजून नाकार सत्यास तू
भ्रामक दु:ख्खास मानुनी
सखये ... विचार मनास तू
डोकावून हृदयी कधीतरी
रोज स्वप्नात येवूनी कोण तुला ग सुखावतो ..?


मन मंदिरी मी तुजसवे नांदतो
तुला न भेटता मनी तुझ्या प्रेमास जाणतो -- ३ --


--- संजय कुलकर्णी .

एकटा असतो तेव्हा ...





एकटा असतो तेव्हा
नेमकी मनी
तू कशी ग येतेस ..?


मनात येऊन हळुवार
मला पाहुनि
तू का ग हसतेस ..?


लाघट गोड हसुनी
गालावरील खळीत
तू कसे ग गुंतवतेस ..?


कुणी नाही बघताच
पटकन चुंबता
तू 'इश्श्य' म्हणून का लोटतेस ..?


--- संजय कुलकर्णी .

जीवन..


जीवन आशेच नाव असत ..
जीवन अनपेक्षितांचे गाव असतं ,
जीवन त्यालाच कळतं
ज्यांच्या अंगी ध्येर्याचं निवास असतं !!


जीवन आनंदाचं नाव असतं ..
जीवन स्वप्नांचं जग असतं ,
जीवन त्यालाच भावतं
ज्यांच्या मनी ध्येय्याचं ठाण असतं ..!!


जीवन अनुभवाचं नाव असतं ..
जीवन विश्वाचं स्वरूप असतं ,
जीवन त्यालाच उमजतं
ज्यांना सर्वांतरी एकात्म्याच रूप दिसतं ..!!


--- संजय कुलकर्णी .