वाळवंटातील अफाट निर्जल वाळुत
रणरणत्या उन्हाला तोंड देत
निवडुंगावर देखील उमलतं कधि
एक हसरं टवटवीत फूल !
कासावीस होतो जीव तेंव्हा....
होता शिडकावा अकस्मात हास्याचा
आपण सुद्धा आयुष्यात कधि
बनतो एक हसरं मूल !
चिंता तर जीवनात
दररोज असतात,
संकटे सुद्धा आगंतुक
येतच असतात !
माणूस झुंज देत असतो
वाढत्या अपुल्यावयाबरोबर ,
डोंगरा एवढ्या दु:खाशी
छोट्याश्या हास्याच्या बळावर !
जेंव्हा दिसते विसंगती ,
अपेक्षाभंग अन अतिशयोक्ती !
नकळत तेंव्हा मनी ,
होते विनोदाची निर्मिती !
निरागसतेतून लहान मुलांच्या
मिळतात मिश्कील उत्तरे !
खोडकर वागण्यात आजोबांच्या
खुलतात हास्याची लकीरे !
समाजात अपुल्या अवती भवती
दिसतात कधी गमतीदार वल्ली !
सहज बोलण्यातून करतात कधी
बेमालूम जवळच्यांची अलगद खिल्ली !
खळाळतात कधी संता बंतांच्या
चक्रम अजब गजब करामती
असते कधी राजकारण्यांच्या कोडगेपणावर
मारलेली हळूच कुणीतरी कोपरखळी !
हसवितो कधी बायकांचा धांधरटपणा ,
कधी प्राध्यापकांचा सवयीचा विसराळूपणा !
फिशपॉन्ड्स,शायरीतील काल्पनिक बोचर्या कल्पना ,
तर जुन्या म्हणींतील खोचक शब्दरचना !
कधी उखाण्यातील उपमांचा ,
असतो प्रयत्न चीडविण्याचा !
जगणे सुसह्य करण्याचा ,
आनंदी शिडकावा हास्याचा !!
( ' हास्य ' हे परमेश्वराने निर्मिलेल, दु:खावर शोधलेलं - कालातीत उत्तर आहे ! )
---संजय कुलकर्णी.

No comments:
Post a Comment